Site icon Onecuriousguide

The Historical Bori Rameshwar Someshwar Mandir | Bori Parbhani District Jintur Taluka

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

 
परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा

Parbhani District Historical Heritage

बोरी गाव ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा

The Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

Bori Gao, Parbhani District, Jintur Taluka, Maharashtra, India, PIN: 431508

The Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka (जिंतूर तालुक्यातील) विशेष गाव आहे. Bori (बोरी) हे गाव जिंतूर परभणी रस्त्यावर आहे. Bori गाव परभणी जिल्ह्याच्या ठिकाणापासून 28 किलोमीटर आणि जिंतूर तालुक्यापासून १४ किमी अंतरावरती असलेले मोठी बाजारपेठ असणारे एक महत्वाचे राजनैतिक पाठबळ असलेले गाव आहे. हे गाव मंदिरे, बारव (पाण्याच्या विहिरी), मठ (धार्मिक ठिकाणे), मशिदी आणि दर्गा (तीर्थस्थान) यासाठी ओळखले जाते.

बोरीपासून जवळ असलेली गावे म्हणजे चांदज chandaj (5 किमी), कोक kok (5 किमी), धानोरा देवगाव (5 किमी), करवली (6 किमी), आणि माक maak (6 किमी), हट्टा hatta, भोगावं bhogav, mainapuri, रिडज ridaj. दक्षिणेला परभणी तालुका, पश्चिमेला सेलू तालुका, दक्षिणेला मानवत तालुका आणि पूर्वेला औंढा नागनाथ Aundha Nagnath etc. तालुका बोरीला वेढलेला आहे. बोरीजवळ परभणी, सेलू, मनवाथ आणि पाथरी ही शहरे वसलेली आहेत.

तसेच बोरी गावाच्या शेजारून सुंदर अशी karpara river (करपरा नदी) वाहते जी पुढे जाऊन सावंगी खुर्द आणि सावंगी बुद्रुक इथे पूर्णा नदीशी संगम पावते. तसेच भोगावं हे बोरी येथून जवळच असलेले देवी चे पुरातन आणि जागृत देवस्थान असणारे गाव आहे, त्याचबरोबर रिडज येथील देवीचे मंदिर उंचीवरती असणारे भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि हट्टा हे हनुमानाचे जागृत देवस्थान असलेले गाव आहे.

बोरीतील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे त्रिदल मंदिर, जे भूमिज नावाच्या अतिशय जुन्या शैलीत बांधले गेले आहे. या मंदिरावरून बोरी गाव फार पूर्वीपासून असल्याचे दिसून येते.

महानुभाव पंथाचे असलेले “भास्करभट बोरीकर नावाचे प्रसिद्ध धर्मगुरू बोरी येथून आले असावेत, असेही म्हटले जाते. त्यांनी शिशुपाल वध, उद्धवगीता आणि संस्कृत काव्य नरविलाप यांसारखी काही महत्त्वाची पुस्तके लिहिली.

बोरीशी जोडलेली आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे “कृष्ण महाराज, जे भागवत धर्मातील संत होते आणि त्यांचा जन्म याच गावात झाला. त्यामुळे बोरी गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे.

The Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

1. श्रीसोमेश्वर मंदिर बोरी
Sree Someshwar Temple Bori

श्री सोमेश्वर मंदिर हे बोरी गावातील खास मंदिर आहे. हे मुख्य बाजार परिसरात आहे आणि ते भूमिज पध्दतीचे आहे. मंदिराचा आकार त्रिकोणासारखा असून गावातील लोकांसाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे.

मंदिर वास्तू बस स्टँडच्या पूर्वेस ३०० मीटर अंतरावर आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे 110 फूट लांब, उत्तरेकडून दक्षिणेकडे 74 फूट रुंद आणि तसेच त्याची उंची 10 फूट 6 इंच असे हे मंदिर खूप मोठे आहे. मंदिराच्या खालचा बराचसा भाग कालौघात जमिनीखाली गेलेला आहे.

श्री सोमेश्वर मंदिराचा सभामंडप

मंदिरासमोर बारव असून त्याला लागूनच सभामंडप आहे. त्यावर आधुनिक छत टाकलेले असल्यामुळे मुखमंडपाची रचना दिसून येत नाही. सभामंडपाचा आकार दक्षिण उत्तर ४२ फूट आणि पूर्व पश्चिम १४ फूट ६ इंच असा आहे. मंडपात आधुनिक पध्दतीची फरशी टाकलेली असल्यामुळे रंगशिळा दिसत नाही.

मंदिरात एकूण आठ देवकोष्ट असून त्यावर मंदिराच्या शिखराचा प्लॅन कोरलेला आहे. देवकोष्टकातील मूळ मूर्ती काळाच्या ओघात लुप्त झाल्या असून सध्या तेथे संगमरवरी दगडाच्या मूर्ती इ.स. १९८६ साली देवराव चौधरी यांनी बसवल्या आहेत.

स्तंभ रचना श्रीसोमेश्वर मंदिर बोरी

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

 

सभा मंडपात आठ स्वतंत्र स्तंभचौदा भिंतीतील अर्धस्तंभ आहेत. एकंदरीत बावीस स्तंभावर मंदिराचा सभामंडप तोललेला आहे. स्तंभाची उंची ६ फूट २ इंच असून रुंदी १ फूट १ इंच अशी आहे.

सर्व स्तंभाची रचना जवळपास सारखीच आहे. स्तंभाला चौरस तळखडा, त्यावर चौकोनी स्तंभ भाग, त्यावर अष्टकोनी आणि अष्टकोनी नक्षीदार पट्टी त्यानंतर चौकोनी ठोकळा, त्यावर निमुळता होत जाणारा गोलभाग नंतर धारदार कनी आणि शेवटी स्तंभशीर्ष व त्यांवर नागदंतहस्त असे स्वरुप आहे. त्यापैकी चौकोनी ठोकळा अतिशय अलंकृत असून त्यावर विविध रुपातील शिल्प-पट आहेत. सभामंडपातील दक्षिणेकडून उत्तरेकडे अनुक्रमे असलेल्या स्तंभशिल्प पटावरील शिल्पांकित शिल्पांकन असे आहे.

स्तंभ क्र. :
विविध रुपातील शिल्पपट या स्तंभावर शिल्पांकित असून पूर्वेकडे तीन पुरुष आणि चार पाय असलेले मनात कुतुहल निर्माण करणारे अंकन आहे. त्यावरील भागात अंजली मुद्रेतील सिध्द पुरुषांचे अंकन आहे.

दक्षिणकडे दोन स्त्री दोन पुरुष असा युद्धपट आहे. त्यावरील भागावर परत सिध्द पुरुषाचे खंडित झालेले अंकन आहे.

पश्चिम भागात ध्यानमुद्रेतील भक्त किंवा स्थपती असून त्यावच्या दोन्ही बाजूस दोन चवरीधारीणी आहेत. त्यावरील भागावर भग्न असलेले सिध्द पुरुषाचे अंकन आहे.

स्तंभाच्या उत्तर भागावर एक नृत्य करत असणारी सुंदरी असून तिच्या दोन्ही बाजूस दोन मृदंगवादक आहेत. या वरील भागावर परत भग्न झालेले सिध्द पुरुषाचे अंकन आहे.

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

 

स्तंभ क्र. :
पूर्व भागावर किन्नर किन्नरी यांचे अंकन आहे.

दक्षिण बाजूस दोन हंस आहेत.

पश्चिम बाजूस अग्नी, स्वाहा आणि स्वधा असून अग्नीदेवतेस दाढी दाखविली असून तो स्थानक रुपात आहे. उत्तर बाजूस मुंगुस पिशवीधारी असून कुबेर आहे.

स्तंभ क्र. :
या स्तंभावर सर्व बाजूस कीर्तीमुख शिल्पांकन आहे.

स्तंभ क्र. :
या स्तंभावर सर्व बाजूस कीर्तिमुखाचे अंकन आहे.

श्री सोमेश्वर मंदिरातिल  गर्भगृहासमोरील दोन स्तंभ (रंगशिळेवरील)

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka

 

स्तंभ क्रं. :
पूर्वबाजूस श्रीकृष्णाचे अंकन रेणूसह असून त्याचे दोन्ही बाजूस चवरीधारी स्त्रिया व पायापाशी गाय आहे. दक्षिण बाजूस एक पुरुष, एक स्त्री आणि दोन आणि असून शिकार प्रसंग आहे.

पश्चिम बाजूस दोन शैवमूर्ती असून त्यापैकी एकाचे चतुर्भुज हातात प्रदक्षिणाकर प्रमाणे अनुक्रमे गदा, खटवांग, नाग आणि अभयमुद्रा आहे. तर दुसऱ्या देवतेच्या चतुर्भुज हातात अनुक्रमे अभयमुद्रा, डमरु, त्रिशुल आणि गदा आहे. उत्तर भागावर हनुमान, देत्य वानर यांचा युध्दाचा प्रसंग आहे.

स्तंभ क्रं. :
पूर्व बाजूस किनर कित्ररी, दक्षिण बाजूस हिरण्यकश्यपू वध प्रसंग, पश्चिम बाजूस कमलकलिका चोचीत पकडलेले युगल पक्षी यांचे शिल्पांकन असून उत्तर बाजूस भैरव आहे.

श्री सोमेश्वर मंदिराच्या  अंतराळातील दोन स्तंभ:

स्तंभ क्रं. :
या स्तंभावर पूर्वबाजूस हत्ती, दक्षिण बाजूस हनुमान पश्चिम बाजूस दोन प्राणी आणि उत्तर बाजूस हनुमानाचे शिल्पांकन आहे.

स्तंभ क्रं.:
या स्तंभावर सर्व बाजूस कीर्तिमुखाचे शिल्पांकन आहे.

  1. अंतराळ आणि गर्भगृह (पूर्व दिशा)

गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी अंतराळातून सरळ मार्गाने प्रवेश होतो. अंतराळाचा आकार दक्षिण उत्तर ६ फूट आणि पूर्व पश्चिम ४ फूट असा आहे. वरील वितान कमी कमी होत जाणारे चौरस असून मध्याभागी कमलदल शिल्पांकित आहे.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार एकस्तंभशाखीय आहे. त्याची उंची ४ फूट ९ इंच व रुंदी २ फूट ५ इंच अशी आहे. उंबरठ्यावर दोन्ही बाजूस कीर्तीमुख कोरलेले आहेत. ललाट पट्टीवर गणेश देवतेचे अंकन आहे. उत्तरांगावर भौमितीक रचना आहे. गर्भगृहात शिवलिंग असून त्याची लांबी ३ फूट ६ इंच, रुंदी २ फूट ३ इंच आहे.

  1. गर्भगृह (दक्षिण दिशा)

सोमेश्वर मंदिरास तीन गर्भगृह आहेत त्यापैकी, दक्षिण दिशेकडील गर्भगृहाची द्वार शाखा एक स्तंभाची देवकोष्ट नाही. बाह्यभिंतीवर भौमितीक नक्षीकाम आहे. गर्भगृहद्वार उंची ४ फूट ४ इंच असून रुंदी २ फूट ३ इंच अशी आहे. ललाट बिंबावर गणेश देवता आहे. उत्तरांग आणि उंबरठा या वर भौमितीक आकृती आहेत. गर्भगृहाची लांबी ५ फूट ४ इंच अशी आहे. फरशीचे नूतनीकरण झालेले आहे. गर्भगृहातील स्तंभ थोडेसे बाहेर आलेले दिसतात. वरील वितान फारसे अलंकृत नसून दोन कमी होत जाणारे चौरस व मध्यभागी फुलांची नक्षी आहे.

प्रस्तुत गर्भगृहात सध्या लक्ष्मी देवता ठेवलेली आहे. जी गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे भुयारात सापडलेली आहे. ही गजलक्ष्मी असून द्विभुज आहे. तिच्या दोन्ही हातात कमलपुष्प आहेत. नविन सिमेंटमध्ये कमल आसन निर्माण करुन त्यावर ती ठेवलेली आहे. मूर्ती ठेवलेल्या खालील आसन पीठावर काही प्राचीन अवशेष शिल्लक आहेत. त्यामध्ये प्रणालचे अवशेष दिसत आहेत.

  1. गर्भगृह (उत्तर दिशा)

उत्तर दिशेकडील गर्भगृहद्वार उंची ४ फूट ३ इंच असून रुंदी २ फूट ४ इंच अशी आहे. एक स्तंभाची द्वारशाखा आहे. ललाटपट्टीवर गणेश देवता आहे. उत्तरांगावर भौमितीक आकृती आहे. गर्भगृहात शिवलिंग असून त्याची लांबी ३ फूट २ इंच, रुंदी २ फूट आहे.

गर्भगृहाच्या नैर्ऋत्य दिशेस खालच्या बाजूस दगडी नांद असून त्यात पाणी साठवण्याची व्यवस्था असावी. गर्भगृहात एक देवकोष्ट असून ते रिकामे आहे. भिंतीत गेलेल्या चार स्तंभाचा थोडासा भाग बाहेर आलेला दिसतो त्यावर कीर्तीमुख आहेत. वरील वितान कमी होत जाणारे चौकोन असून मध्यभागी कमलपुष्प अंकीत आहे. गर्भगृहाची लांबी ५ फूट ६ इंच असून रुंदी ५ फूट ६ इंच अशी आहे       

मंदिराचा वाह्यभाग

मंदिराचा वाह्यभाग पाहता वास्तूचे उपपीठ आणि अधिष्ठान कालौघात जमिनीत दवल्या गेले आहे. त्यामुळे या वास्तूची स्तररचना आणि पायऱ्या दिसत नाहीत. मंदिराच्या तीनही गर्भगृहावर ग्रामस्थांनी आधुनिक पध्दतीने शिखर बांधले आहे. त्यांची उंची १८ फूट आहे. बाह्यभिंतीवर एकही असून या शिवाय तारकाकृती आकार कोरलेले, क्षिप्त व उक्षिप्त कंगोरे यांचा थर साधलेला आहे.

The Historical Bori | Rameshwar – Someshwar Mandir

 

रामेश्वरसोमेश्वर मंदिर बोरी बारव:
The Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Barava:

सोमेश्वर मंदिर बोरी समोर असलेली बारव ही “रामेश्वर सोमेश्वर बारव या नावाने प्रचलित आहे. या परिसरात रामेश्वर महादेव मंदिर आणि सोमेश्वर मंदिरासाठी लागणाऱ्या पाण्याची योजना म्हणून ही बारव निर्माण केलेली आहे. बारवेची लांबी 34 फूट असून खोली ५० फूट आहे.

बारवेत पूर्व व उत्तर दिशेला वरील स्तरावर हत्तीची छोटी शिल्प कोरलेली आहेत. बारवेला पायऱ्या नसून जीर्णोध्दारीत नूतन बांधणी दिसून येते. चौरसाकृती आकाराच्या बारवेत पाणी असून बारवेच्या दक्षिणेकडे गावाला टेकड्यासारखा भाग असल्यामुळे दक्षिणेकडून झरे किंवा पाणी खोत असावा.

2.श्रीरामेश्वर महादेव मंदिर बोरी

बोरी गावातील श्रीरामेश्वर महादेव मंदिर एक प्राचीन वास्तू असून प्राचीन मंदिराचा काही भाग या वास्तूत शिल्लक आहे. काही प्राचीन मूर्तीशिल्प या ठिकाणी आहेत. सध्या आधुनिक पध्दतीने मंदिराची दुरुस्ती केलेली आहे. या वास्तूचा आकार पूर्व पश्चिम लांबी ३४ फूट असून दक्षिण उत्तर रुंदी २६ फूट आहे. मंदिराचा बाह्यभाग पाहता मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या खोलीच्या जोत्यावर कामशिल्पे आहेत. उत्तर प्रवाही साधी प्रणाल आहे. संपूर्ण वास्तू भोवती जमिनीत शिल्प असावीत.

सभामंडप:

मंदिरात प्रवेश करतांना सभामंडपात सरळ प्रवेश होतो. सभामंडपाचे सिमेंटने नूतनीकरण केले आहे. आधुनिक फरशी बसवली आहे. सभामंडपात दोन देवकोष्ट असून त्यात उजव्या बाजूला मधुसूदन असून डाव्या बाजूला विष्णूमूर्ती देवकोष्टमध्ये ठेवलेली आहे.

मधुसूदन मूर्ती:

गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील देवकोष्टातील मूर्ती पद्मपुराणाप्रमाणे मधुसूदनाची आहे. देवता चतुर्भुज असून उजवीकडील खालील हातात चक्र असून वरील हातात शंख आहे. डाव्यात वरील हातात पद्म असून खालील हातात गदा आहे. डोक्यावर किरीटमुकुट आणि गळ्यात हार आहे. खाली नमस्कार मुद्रेत गरुड आहे. मूर्तीची उंची २ फूट ६ इंच असून रुंदी १ फूट ४ इंच अशी आहे.

विष्णूमूर्ती:

सभामंडपाचे देवकोष्टात गर्भगृहाच्या डाव्या बाजूस विष्णूमूर्ती आहे. देवता चतुर्भुज असून उजव्या खालील हातात गदा असून वरील हातात पद्म आहे डाव्या वरील हातात शंख असून खालील हातात चक्र आहे. डोक्यावर किरीटमुकुट असून गळ्यात लोंबता हार आहे. तुलसीमाळा आणि जान्हवे परिधान केले आहे. नमस्कार मुद्रेत मानवरुपात असलेला गरुड पायाजवळ उजव्या बाजूस आहे तर डावीकडे सेविका आहे. मूर्तीची उंची २ फूट ४ इंच आहे.

अंतराळ गर्भगृह:

कोणतेही देवकोष्ट नसलेले अंतराळ आहे. अंतराळाचे चार स्तंभ भिंतीत आहेत अंतराळाची लांबी ५ फूट १० इंच असून रुंदी ८ फूट ४ इंच अशी आहे. गर्भगृहाची द्वारशाखा एकस्तंभीय आहे. द्वार उंची ४ फूट १० इंच असून रुंदी २ फूट १० इंच अशी आहे.

गर्भगृहातील देवता पाषाणाचे शिवलिंग असून त्याची लांबी ४ फूट ६ इंच, रुंदी ३ फूट ३ इंच लिंगाचा घेर २ फूट ४ इंच असून लिंगाची उंची ७ इंच अशी आहे. वरील वितान कमी होत जाणारे दोन चौकोन असून त्यात मध्यभागी कमलकलिका आहे. गर्भगृहाचा आकार ८ फूट ७ इंच आणि ८ फूट ७ इंच रुंदी आहे. प्रस्तुत मंदिराचे अवशेष पाहता हे प्राचीन मंदिर असून सध्या त्याचे नूतनीकरण केलेले आहे.

परिसरातील शेषशायी विष्णूमूर्ती:

सोमेश्वर मंदिराच्या पश्चिम बाजूस लिंबाच्या वृक्षाखाली एक शेषशायी विष्णूमूर्ती ठेवलेली आहे. देवता चतुर्भुज आहे. उजवीकडील खालील हात भग्न असून वरील हात उशाला लावला आहे. बाजूला शंख आहे. डावीकडील वरील हातात चक्र असून खालील हातात गदा आहे.

विष्णूचे वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत. खालील बाजूस लक्ष्मी सेवेत आहे व सोबत वाहन गरुड आहे. विष्णूचे मुख भग्न झालेले आहे. मूर्तीचा आकार पाहता उंची ३ फूट ८ इंच असून रुंदी १ फूट ८ इंच अशी आहे.

एकंदरीत बोरी हे गाव ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले वारसा स्थळ आणि शिल्प स्थापत्य अवशेष असलेले गाव असून या गावात त्रिदल मंदिर स्थापत्य आणि बारव स्थापत्य विशेष महत्त्वाचे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे.

 

सुनिल दिगंबरराव पोटेकर:

परभणी जिल्ह्यातील प्राचीन स्थापत्याच्या उत्कटतेतून पाच वर्षापूर्वी एकट्याने सुरू केलेला प्रवास विविध वळणांनी पुढे सरकत गेला आणि अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्याने हे शक्य झाले आहे.चाळीस दिवसांच्या साडे तीन हजार किलोमीटरच्या प्रवासातून संपूर्ण परभणी जिल्हा पिंजून अभ्यासगटाने केलेल्या ५५ वारसा स्थळांच्या सर्वेक्षणाचा परिपाक म्हणजे जिल्ह्यातील १३० प्राचीन मंदिर स्थापत्य, ४९२ प्राचीन शिल्पकला, ५० सतीशिळा आणि वीरगळ, १७ शिलालेख आणि ५३ प्राचीन बारवा एवढा ऐतिहासिक वारसा संशोधित झाला.

या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आणि माझ्या सोबत कार्य करणाऱ्या अभ्यासगटातील सर्व सदस्यांचे आहे. विनामोबदला नि:स्वार्थ भावनेतून तळमळीने आणि आंतरिक उर्मीने सर्वांनी एकजुटीने हे कार्य पूर्ण केले आहे.

भारतीय प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि मूर्तीशास्त्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व डॉ. गो.बं. देगलूरकर आणि डॉ. प्रभाकर देव यांचे आशीर्वाद तसेच डॉ. आत्माराम शिंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आम्हास लाभले.

अभ्यासगटातील डॉ. नितीन बावळे, डॉ. अविनाश खोकले, डॉ. सीमा नानवटे, श्री. अनिल स्वामी, श्री. लक्ष्मीकांत सोनवटकर, श्री. मल्हारीकांत देशमुख, श्री. अनिल बडगुजर, श्री. नीलकंठ काळदाते, श्री. वैजनाथ काळदाते, श्री. नागेश जोशी, श्री. प्रल्हाद पवार यांच्यासोबत मराठी भाषा विषय तज्ज्ञ डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांचा ही मोलाचा सहभाग आहे.मा. आंचलजी गोयल मॅडम यांनी परभणी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रकल्पाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.

कलात्मक छायाचित्रणासाठी श्री. सुधीर देऊळगावकर आणि प्रभावी मांडणीसाठी श्री. संजय ठाकरे यांची निवड सार्थ ठरली.

पृष्ठमयदिच्या अधिन राहून नेमक्या छायाचित्रांची निवड आणि शब्दांकनासाठी श्री. अनिल स्वामी आणि डॉ. सीमा नानवटे यांनी मला महत्त्वाचे सहकार्य केले.

इंटेक, नांदेडचे श्री. सुरेश जोंधळे यांचेही मार्गदर्शन लाभले.

गेल्या पाच वर्षांत या कामातील सातत्य आणि सकारात्मक उर्जेचा स्त्रोत कायम राहिला, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसोबत समन्वय साधत गेल्या पाच वर्षात मी ही घडत गेलो. प्रत्येक टप्प्यावर जे जे लोक भेटत गेले ते सर्व माझ्याशी कायमचे जोडले गेले, त्या सर्वांचे शतशः धन्यवाद !

आपल्या परभणी जिल्ह्याकडे देश-विदेशातील संशोधकांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल असा मला विश्वास वाटतो.


सुनिल दिगंबरराव पोटेकर
मुख्य प्रकल्प समन्वयक
परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा अभ्यासगट
तथा जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

Historical Bori Rameshwar Someshwar Mandir Bori Parbhani District Jintur Taluka
Exit mobile version