Animal Movie 2023
Animal Movie 2023

Animal Movie 2023 | Animal Movie Best Review 2023

Animal Movie 2023 | Animal Movie Best Review 2023

अॅनिमल किंगडम’ची नांदी

Animal Movie बघितला.. फार काही मोठ्या अपेक्षा सोबत घेऊन गेलो नव्हतो म्हणून भ्रमनिरास होण्याला कुठली संधी मिळाली नाही. त्यामुळे सिनेमात सर्वत्र ठोक-ठाक असली तरी सिनेमा ठीक ठाक वाटला. कुठलेही सिनेमे तुम्ही त्यात काही लॉजीक असेल असं म्हणून बघायला जाणं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारख असतं. वास्तविक आयुष्याशी त्यांचा काही एक संबंध नसतो. दिग्दर्शक वांगा यांनी छोट्या छोट्या जागा भरून चांगलं दिग्दर्शन केलेलं दिसून आलं.

बाकी पूर्ण सिनेमा वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका माथेफिरू नायकाचा आहे. त्याच्यासाठी बापापुढे सारेच फिके. बालपणी बापाचं प्रेम न मिळालेला पण बापाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ‘विजय’ ची ही कहाणी. बापावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला घेणं इतकंच काय त्याच लक्ष. मग त्यातुन घडणारी हिंसा त्यांच्यासाठी कुठलीच मीस्टेक नसते. पण ती आपल्याला मात्र इरिटेड करायला उठते. सिनेमात साऊथ टच दिसून येतो. पार्श्व संगीत ही पात्राची ओळख मनात निर्माण करते. सिनेमा लांबलेला वाटतो. सिनेमा म्हटलं की हिरो हा अमर असतो आणि तो राहायला हवा. याच गणिताने हा Animal Movie सुरू राहतो.

दिग्दर्शकाने हा सिनेमा बनवतांना त्यात पुरुषीमानसिकेतचा ठसा उमटविण्याच पूर्ण स्वातंत्र्य वापरलं आहे. त्यात कुठेच कमी येऊ दिलेली नाही. स्त्री नेहमी वस्तू म्हणून उपभोगली गेली आहे. तिला इथे का म्हणून ‘माणूस’ दाखवायचं? कुठं तरीच एक-दोन वाक्य किंवा एक-दोन कृती ह्या पुरुषीमानसिकतेला लोळवणाऱ्या दिसून येतात. बाकी सर्व साम्राज्य हे असा एक पुरुष जो ‘मै करे सो कायदा’.

कुठे बोअर किंवा कुठे शिनवटा(फायटिंग सोडून) यायला जागा नाही, कारण आता पुढे अजून काय वाढून ठेवलयं याची वाटणारी उत्कंठा. कथेत हवा तसा दम वाटला नाही. बॉलिवूड इथेच रुळावरून घसरतांना दिसत आहे. कौटुंबिक वाद हे आपण लहानपणापासून बघत आलोय. इतकंच की या सिनेमात आपल्याला हे रुद्ररुप धारण केलेले कौटुंबिक वाद मोठ्या पडद्यावर बघायला मिळतात.

प्रेम कहाणी नेहमीचीच. पण त्यात दाखवलेला प्रणय मात्र थोडा नवीन वाटला, विमानात वैगरे आणि पुढे भल्या मोठया खुल्या जागेत. तेव्हा थंडीच्या या वातावरण आपल्यालाही गुदगुल्या होण्यावाचून राहत नाही. एकीकडे विमान हवेत उडत आहे तर दुसरीकडे हिरो-हिरोईन वेगळ्या शिखराव पोहचत असतांना दिसतात. असो, सिंगल लोकांनी त्यावर जास्त न बोललं बरं.

द केरला स्टोरी समजून घेताना काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं !

प्रत्येक बापाला वाटतं आपला बिजनेस आपण आपल्या मुलाकडे हँडओव्हर करावा. पण त्यासाठी तो बाप आपल्या मुलात त्या पात्रता शोधत असतो. या सिनेमात त्या पात्रता बलबीर (अनिल कपूर) सिंग या फॅक्टरी मालकाला आपल्या मुला ऐवजी त्या आपल्या जावायात दिसतात. याच भोवती पुढे-मागे ही कहाणी घिरक्या घेत असते. त्यातून फार वेगळं काही हाती लागत नाही.
एक निरीक्षण असं की रणबीरची या सिनेमातील पिता-पुत्राच्या नात्यातील कहाणी ‘तमाशा’ आणि ‘संजू’ या दोन सिनेमांशी साधर्म्य साधताना दिसते. रणबीरचे असे बरेच सिनेमे आहेत ज्यात रणबीरला फादर इशूज आहेत असं दिसून येतं. यातही तो कित्ता गिरवलेला आहे.

आता अभिनयाच्याबाबत बोलायचं झालं तर सुरवात ‘अनिल कपूर’ पासून करूयात. अनिल कपूर कसलेला चिरतरुण अभिनेता. त्याच फ्रेम्समध्ये असनच सुखावणारं असतं. इथेही त्याने स्वतःच्या बीजनेसबाबत डेडीकेटेड असणारा आणि कुटूंबासाठी वेळ नसणारा एक ‘बिझी बिजनेस मॅन’ उत्तमरित्या रंगवलेला आहे. खूप दिवसांनी ‘शक्ती कपूर’ला मोठ्या पडद्यावर बघितलं. एकदम चेंज कॅरेक्टर.

रश्मीका मंधना‘ साऊथची टॉप हिरोईन असली, तिचा अभिनय नेहमीच वाखाणण्याजोगा राहिला असला, तरी या सिनेमात ती ताकदीची वाटली नाही. पण तरी सुद्धा आपण तिच्या म्हणजे ‘गीतांजली’च्या घुसमटीला वाट मोकळी करायला तिच्यासोबत हवे होतो असं कुठे तरी वाटतं. स्त्रीच्या वाट्याला पुरूषप्रधान संस्कृतीकडून येणारं शोषण इथे गीतांजलीला चुकलं नाही.

उपेंद्र लिमये‘ बस फक्त नाव काफी आहे. या वाक्याला जागणारा अभिनेता. मराठी नाव जगात गाजवलं या माणसाने. ‘फेड्डी’ नावाचं हे कॅरेक्टर काही मिनिटंच फ्रेम्समध्ये वावरतं पण ते केव्हा हवंहवंसं होऊन जातं कळत सुद्धा नाही. आपसूकच त्याच्या तोंडच ‘चांगभलं’ हे वाक्य आपल्या तोंडुनही निघतं. आपलं मराठीवर प्रेम सुद्धा इथे उफाळून यायला होतं.

‘रणबीर कपूर..’ सिनेमातला मुख्य नायक असलेला विजय. रणबीरच्या आजवर पाहिलेल्या सिनेमांमध्ये ‘ब्रम्हांस्त्र’ सिनेमा वगळता त्याच्या अभिनयावर कुठे बोट ठेवायला जागा नाही. गुडी-गुडी, चॉकलेट हिरो ते डायरेक्ट एक माथेफिरू, हिंसाखोर रणबीर कपूर बघणं जरा वेगळा अनुभव होता. त्याने ज्या ताकदीने हा सिनेमा पेलून धरला त्याला तोड नाही. विजय या पात्राच प्रेमळ असणं आणि क्षणात घातकी होणं हे डोळे विस्फारण्यासारखं आहे.

 खरं आपलाच विश्वास बसत नाही आणि आपल्याला प्रश्न पडतो हा रणबीर आहे? एक सनकी, माथेफिरू, प्रेमळ विजय उभा करण्यात रणबीरने कसली कस्सर सोडलेली नाही. त्याचा अभिनय हा नेहमीच माझ्यासाठी आवडीचा विषय राहिला आहे. त्याच आवडीतून ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा बघणं क्रमप्राप्त ठरलं.

Read more about 12th Fail Full Movie Review


आता सर्वात शेवटी काळजाच्या जवळ असणारा ‘बॉबी देओल’ याच्याबद्दल. ते म्हणतात ना ‘भाव खाऊन जाणे’ ते काम केलंय या सिनेमात बॉबी देओलने. त्याच्या तोंडी कसलाच डॉयलॉग नाहीये. तरी त्याने कमाल केलीय. बदलाच्या आगीत जळणारा ‘बरार हक’ हे पात्र त्याने ज्या पद्धतीने रंगवलं की असं वाटायला लागतं की हा परत-परत फ्रेम्समध्ये यावा. पण दिग्दर्शकाने का कोण जाणे त्याची भूमिका मर्यादित करून प्रेक्षकांना झुलवत ठेवलय.

तर एकूणच Animal Movie बद्दल सांगायच झालं तर फार ‘उत्तम’ नाही किंवा फार ‘वाईटही’ नाही. असा ‘मध्यम क्वालिटी’ असणारा हा सिनेमा आहे. त्यातील हिंसा बघून शीर्षकाला न्याय मिळाला आहे. आता ही अ‍ॅनिमल संख्या कमी होती म्हणून पुढचा पार्ट ‘अ‍ॅनिमल पार्क’ या नावाने येणार याची घोषणा सिनेमात केलेली असली तरी अजून त्यापुढे जाऊन ‘अ‍ॅनिमल किंगडम’ या नावाने तिसरा भाग आला तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही. म्हणजेच अ‍ॅनिमलच्या सिरीजमध्ये पुढील येणाऱ्या भागात अधिक हिंसा बघण्याची मानसिक तयारी करून ठेवायला हरकत नाही.

लखन शोभा बाळकृष्ण

0 Shares

Leave a Reply